पीएम किसान योजनेचे पैसे ६ हजार रुपयांवरून १२ हजार होणार का? संसदेत सरकारनं दिली माहिती
पीएम किसानचे पैसे ६ हजार रुपयांवरून १२ हजार होणार का?, सरकारनं राज्यसभेत दिली माहिती
असा कोणताही प्रस्ताव तूर्त विचाराधीन नसल्याचे कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांच्याकडून स्पष्ट
पीएम किसान योजनेअंतर्गत नवीन नोंदणीसाठी शेतकरी ओळखपत्र बंधनकारक
PM Kisan Yojana: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येकी २ हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमधून वर्षाला ६ हजार आर्थिक मदत दिली जाते. डिसेंबर २०२४ मध्ये संसदीय स्थायी समितीने ही रक्कम वाढवून १२ हजार रुपये करण्याचा प्रस्ताव मांडला होता. पीएम किसान योजनेची रक्कम दुपटीने वाढविण्याची ही शिफारस सरकारने स्वीकारली आहे का? या प्रश्नावर राज्यसभेत (Rajya Sabha) सरकारने उत्तर दिले आहे.
याबाबत राज्यसभेतील तृणमूलचे खासदार समीरुल इस्लाम यांनी प्रश्न उपस्थित केला. याला उत्तर देताना, कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर (Ramnath Thakur) यांनी, याबाबत असा कोणताही प्रस्ताव तूर्त विचाराधीन नसल्याचे म्हटले आहे.
पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्राची (farmer ID) नोंदणी बंधनकारक आहे का? असाही प्रश्न इस्लाम यांनी उपस्थित केला. त्यावर मंत्री ठाकूर यांनी सांगितले की, ज्या १४ राज्यांत शेतकरी नोंदणीचे काम सुरू आहे; तिथे पीएम किसान योजनेअंतर्गत नवीन नोंदणी करण्यासाठी शेतकरी ओळखपत्र बंधनकारक केले आहे.