मुख्यमंत्री बळीराजा शेत रस्ते योजना: कार्यपद्धती निश्चित, शेतकऱ्यांना मोठा दिलासा!
महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या शेत आणि पाणंद रस्त्यांचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्य सरकारने नुकतीच ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत व पाणंद रस्ते योजना’ जाहीर केली आहे. या योजनेसाठी आवश्यक कार्यपद्धती निश्चित करणारा सविस्तर शासन निर्णय (GR) प्रसिद्ध करण्यात आला असून, यामुळे या योजनेला आता राजाश्रय मिळाला आहे. शेतीत यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे, परंतु शेतात अवजारे आणि शेतमाल ने-आण करताना रस्त्यांअभावी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
पक्के रस्ते, मोफत पोलीस बंदोबस्त आणि मोजणी
या योजनेअंतर्गत आता राज्य आणि जिल्हा रस्त्यांच्या धर्तीवर पक्के आणि मजबूत शेत रस्ते आणि पाणंद रस्ते तयार करण्यात येणार आहेत. पूर्वीची ‘मातोश्री ग्रामसमृद्धी योजना’ कायम ठेवून, ही नवी योजना सुरू करण्यात आली आहे. या नव्या योजनेत जुन्या योजनांमधील त्रुटी आणि कमतरता भरून काढल्याचा दावा शासनाकडून करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचणार असून, शेतमाल थेट बाजारपेठेत पोहोचवणे सोपे होणार आहे. शेतकऱ्यांसाठी या योजनेत अनेक महत्त्वपूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, शेत रस्ते तयार करण्यासाठी मोफत पोलीस बंदोबस्त आणि मोफत मोजणीची सुविधा उपलब्ध असेल.
सातबारावर होणार रस्त्याची नोंद
प्रत्येक रस्त्याला स्वतंत्र क्रमांक देण्यात येईल आणि त्याची नोंद शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर करून ती कायमस्वरूपी सरकारी अभिलेखात राहील. तसेच, गाव नकाशावरील आणि शासकीय जागेतील अतिक्रमणे सात दिवसांच्या आत काढली जातील. रस्त्यांचे नुकसान करणाऱ्यांवर शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल केला जाईल, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, रस्त्यांसाठी लागणाऱ्या गाळ, माती आणि मुरुमासाठी रॉयल्टी माफ करण्यात आली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होणार आहे.
निधीसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष आणि विविध स्रोत
निधीच्या उपलब्धतेबद्दल बोलायचं झाल्यास, या योजनेसाठी राज्य सरकारने स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अर्थसंकल्पातून स्वतंत्र निधीची तरतूद होईल. याव्यतिरिक्त, 15 वा वित्त आयोग, विविध 14 सरकारी योजनांमधील निधी, कंपन्यांचा सामाजिक दायित्व निधी (CSR), आणि आमदार-खासदारांचा फंड यांसारख्या विविध स्रोतांतून या योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
भूसंपादन नाही, स्वेच्छेने जमिनीचे दान
योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी, राज्य, जिल्हा आणि विधानसभा पातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांमध्ये प्रगतशील शेतकऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. शेत रस्त्यांसाठी भू-संपादन (Land Acquisition) करता येणार नाही, परंतु ज्या शेतकऱ्यांची जमीन स्वेच्छेने उपलब्ध असेल, त्यांच्याकडून दानपत्र, बक्षीस पत्र किंवा हक्कसोड करून घेण्यात येणार आहे. ही योजना पुढील पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात शेत रस्ते आणि पाणंद रस्ते तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवून कार्यरत राहील, असे सरकारने स्पष्ट केले आहे.