ज्येष्ठ नागरिकांना मिळणार दरमहा १५०० रुपये निवृत्तीवेतन; जाणून घ्या योजनेची पात्रता आणि अर्ज प्रक्रिया.
राज्य सरकारने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था निवृत्ती वेतन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील (BPL) कुटुंबातील ६५ वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त निधीतून दरमहा एकूण १,५०० रुपये निवृत्तीवेतन दिले जाते.
६५ ते ७९ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था निवृत्ती पेन्शन योजनेतून दरमहा २०० रुपये आणि राज्य सरकारकडून श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती पेन्शन योजनेतून दरमहा १,३०० रुपये मिळतात. त्यामुळे त्यांना एकूण दरमहा १,५०० रुपये निवृत्तीवेतन मिळणार आहे.
तर ८० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना केंद्र सरकारकडून दरमहा ५०० रुपये आणि राज्य सरकारकडून दरमहा १,००० रुपये मिळतात. अशा प्रकारे त्यांनाही दरमहा एकूण १,५०० रुपये निवृत्तीवेतन मिळणार आहे.
योजनेचा उद्देश
दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील ६५ वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक आधार देऊन त्यांची उपजीविका सुरक्षित करणे. तसेच त्यांच्या रोजच्या गरजा व आरोग्यविषयक खर्च भागविण्यास मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
योजनेचे फायदे
या योजनेंतर्गत ६५ वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना दरमहा १५०० रुपयांचे आर्थिक मदत मिळते.
आवश्यक कागदपत्रे
अर्जदाराचे आधार कार्ड
पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
ओळख पुरावा म्हणजे मतदार ओळखपत्र, वाहनचालक परवाना
निवासाचा पुरावा
वयाचा पुरावा
दारिद्र्य रेषेखालील (बी. पी. एल.) कार्ड/संबंधित कागदपत्रे
जात प्रमाणपत्र, लागू असल्यास
पत्त्याचा पुरावा
बँक पासबुक/बँक खात्याचा तपशील
आवश्यक असल्यास इतर कागदपत्रे
योजनेच्या पात्रता व अटी
अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
अर्जदाराचे वय 65 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे.
अर्जदार दारिद्र्य रेषेखालील (बी. पी. एल.) कुटुंबातील असावा.
अर्जदाराला कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत निवृत्तीवेतनाचा लाभ मिळत नसावा.
अर्ज प्रक्रिया
अर्जदाराने संबंधित कार्यालयातून जिल्हा सामाजिक न्याय कार्यालय किंवा तालुका कार्यालयातून अर्जाचा विहित नमुना घ्यावा.
अर्ज अचूक माहितीने भरावा.
आवश्यक कागदपत्रे व छायाचित्र जोडावे.
स्वाक्षरीसह अर्ज सादर करावा.
त्यानंतरअर्ज स्वीकारल्याची पावती घ्यावी.