पीएम किसान योजनेचा हप्ता सुरू ठेवायचा असेल, तर ‘हा’ फॉर्म त्वरित भरा!
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. योजनेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने आता फिजिकल व्हेरिफिकेशन (प्रत्यक्ष पडताळणी) प्रक्रिया सुरू केली आहे. ज्या शेतकऱ्यांचे हप्ते अचानक बंद झाले आहेत किंवा ज्यांना भविष्यातही लाभ मिळवायचा आहे, अशा संशयास्पद लाभार्थ्यांची यादी तालुका आणि ग्राम पातळीवरील कृषी कार्यालयांत आली आहे. या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांना एक विशेष फॉर्म भरून कृषी विभागाकडे जमा करणे अनिवार्य आहे, अन्यथा त्यांचा हप्ता कायमचा बंद होऊ शकतो.
लाभार्थी संख्या घटली; ‘हे’ शेतकरी रडारवर
राज्यामध्ये २१ व्या हप्त्याचे वितरण होत असताना लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे दिसून आले आहे. सुमारे २ लाख ४८ हजार ३२६ लाभार्थी या योजनेतून बाद झाले आहेत. या प्रक्रियेत एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्ती लाभ घेत असणे, जमीन विकूनही लाभ घेणे, मयत लाभार्थ्यांच्या नावे हप्ते जमा होणे किंवा प्राप्तिकर (Income Tax) भरणारे शेतकरी अशा संशयास्पद लाभार्थ्यांची नावे स्वतंत्र यादीत टाकण्यात आली आहेत. ही संख्या भविष्यात आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने, वेळीच आपली पात्रता सिद्ध करणे गरजेचे आहे.
फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी आवश्यक कागदपत्रे आणि निकष
फिजिकल व्हेरिफिकेशनचा फॉर्म भरताना शेतकऱ्यांना काही महत्त्वाचे निकष पूर्ण करावे लागतील. यामध्ये शेतकऱ्याचे नाव, गाव, गट नंबर, आधार क्रमांक, मोबाईल नंबर आणि फार्मर आयडी (Farmer ID) ही माहिती द्यावी लागेल. तसेच, १ फेब्रुवारी २०१९ पूर्वी जमीन धारण केली असल्याचा पुरावा, रेशन कार्डची प्रत, गेल्या एक महिन्यातील सातबारा उतारा आणि कुटुंबातील सदस्यांचे आधार कार्ड जोडावे लागेल. जर एखादा लाभार्थी मयत झाला असेल, तर त्यांच्या वारसांना मृत्यूचा दाखला आणि वारस नोंदीचा फेरफार सादर करावा लागेल.
कुणाला मिळणार नाही या योजनेचा लाभ?
या पडताळणी प्रक्रियेत काही ठराविक गटातील व्यक्तींना या योजनेतून अपात्र ठरवले जाणार आहे. यामध्ये माजी किंवा विद्यमान मंत्री, खासदार, आमदार, महापौर किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष यांचा समावेश आहे. तसेच, केंद्र किंवा राज्य शासनाचे निवृत्त किंवा सेवेतील कर्मचारी (चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून), १० हजार रुपयांपेक्षा जास्त निवृत्ती वेतन घेणारे व्यक्ती, डॉक्टर, वकील, इंजिनिअर आणि गेल्या पाच वर्षांत प्राप्तिकर भरलेले शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरतील. मात्र, गट ‘ड’ (Class IV) मधील कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
हप्ता बंद झाला असल्यास काय करावे?
जर तुमचा हप्ता १२ व्या, १८ व्या किंवा २० व्या हप्त्यापासून बंद झाला असेल, तर त्वरित आपल्या गावातील कृषी सहायकाशी किंवा तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. तिथे उपलब्ध असलेल्या ‘संशयास्पद लाभार्थ्यांच्या यादीत’ तुमचे नाव आहे का, याची खात्री करावी. जर तुमचे नाव यादीत असेल आणि तुम्ही पात्र असाल, तर वरील सर्व कागदपत्रांसह फिजिकल व्हेरिफिकेशनचा फॉर्म भरून द्यावा. यामुळे तुमच्या पात्रतेची ऑनलाईन नोंद होईल आणि अडकलेले हप्ते पुन्हा सुरू होण्यास मदत होईल. चुकीच्या पद्धतीने यादीत नाव गेलेल्या पात्र शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे.