Farmer loan waiver ; शेतकऱ्यांने सावकारी कर्जसाठी विकली किडनी.
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथूर गावातील शेतकरी रोशन कुडे यांची ही अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक कहाणी आहे. रोशन कुडे यांच्याकडे चार एकर शेती असून त्यांनी जोडधंदा म्हणून बारा दुधाळ गाई खरेदी केल्या होत्या. बँकांकडून वेळेवर कर्ज न मिळाल्याने त्यांनी दोन सावकारांकडून प्रत्येकी पन्नास हजार असे एकूण एक लाख रुपये कर्ज घेतले. मात्र, दुर्दैवाने त्यांच्या गाईंना लंपी आजाराची लागण झाली आणि मोठ्या प्रमाणावर खर्च करूनही त्या दगावल्या. यामुळे त्यांच्यावर असलेल्या कर्जाचा बोजा वाढत गेला आणि सावकारांनी वसुलीसाठी त्यांच्याकडे तगादा लावला.
सावकारांकडून होणारा अपमान आणि धमक्यांना कंटाळून रोशन कुडे यांनी सुरुवातीला आपली दोन एकर जमीन आणि ट्रॅक्टर विकला. इतकेच नाही तर त्यांनी पत्नीचे दागिने आणि घरातील इतर साहित्य विकूनही सावकारांचे कर्ज फिटले नाही. अवघ्या एक लाख रुपयांचे कर्ज व्याजामुळे वाढत जाऊन तब्बल ७४ लाख रुपयांपर्यंत पोहोचले. या कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी सावकारांनी त्यांना किडनी विकण्याचा अघोरी सल्ला दिला. हतबल झालेल्या कुडे यांनी अखेर आपल्या कुटुंबाच्या सुटकेसाठी स्वतःची किडनी विकण्याचा निर्णय घेतला.
किडनी विकण्यासाठी सावकारांनी कुडे यांना कंबोडिया देशातील नॉम पेन या शहरात नेले. तिथे १४ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून त्यांची किडनी काढण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर २६ ऑक्टोबर रोजी ते भारतात परतले, मात्र एवढे करूनही सावकारांचे कर्ज पूर्णपणे फिटले नाही. आजही त्यांच्याकडे पैशांसाठी तगादा लावला जात आहे. या छळाला कंटाळून कुडे यांनी पोलीस तक्रार केली, परंतु सुरुवातीला पोलिसांनी या तक्रारीची दखल घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या घटनेनंतर शेतकरी नेत्यांनी आणि विविध संघटनांनी राज्य सरकारवर तीव्र टीका केली आहे. पोलिसांनी आता या प्रकरणी सहा सावकारांवर गुन्हे दाखल केले असून त्यापैकी चौघांना अटक केली आहे, तर दोन सावकार अद्याप फरार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी हे गृहविभागाचे अपयश असल्याचे म्हटले असून मानवी तस्करीचा हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले आहे. किसान सभेने शेतकऱ्यांचे सावकारी कर्जही माफ करण्याची मागणी केली आहे. पोलीस आता या प्रकरणाचा मानवी तस्करीच्या कोनातूनही तपास करत आहेत.
शेतकऱ्याला कर्ज फेडण्यासाठी चक्क स्वतःची किडनी विकावी लागणे ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. बँकांकडून सहज कर्ज मिळत नसल्यामुळे शेतकरी नाइलाजास्तव सावकारांच्या दारात जातात आणि तिथे त्यांची मोठी आर्थिक लूट होते. राज्य सरकारने अशा अवैध सावकारीवर कठोर निर्बंध घालणे आणि शेतकऱ्यांना सुलभ पतपुरवठा करणे गरजेचे आहे. अन्यथा, कर्जाच्या पाशात अडकून शेतकऱ्यांना अशा प्रकारचे जीवघेणे निर्णय घ्यावे लागतील, जे समाजासाठी अत्यंत क्लेशदायक आहे.