Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना 1500 नाही तर थेट 4500 रुपये मिळणार, पण कधी? जाणून घ्या.
महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूपच लोकप्रिय योजना ठरली आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचा लाभ दिला जातो.
मात्र, नोव्हेंबर आणि महिन्याचा लाभ लाडक्या बहिणींना अद्याप मिळालेला नाहीये. त्यामुळे हे पैसे कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला आहे. याच संदर्भात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.
नेमकं काय घडलं?
राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे नोव्हेंबरचा हप्ता हा डिसेंबर महिन्याच्या 4 तारखेनंतर मिळण्याची शक्यता होती. मात्र, राज्यातील काही नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 21 डिसेंबर रोजी मतमोजणी जाहीर झाली. त्यामुळे 22 तारखेनंतर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबरचा हप्ता मिळण्याची दाट शक्यता होती. पण आता निवडणूक आयोगाने राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे.
महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता
महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने आता लाडक्या बहिणींना तुर्तास तरी योजनेचे पैसे मिळणार नाहीयेत. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. त्यामुळे लाडक्या बहिणींना 17 जानेवारीनंतर योजनेचा लाभ मिळणार आहे.
लाडक्या बहिणींना थेट 4500 रुपये मिळणार?
महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी अशा तिन्ही महिन्यांचे एकत्रित 4500 रुपये मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. पण निवडणुकीनंतर सरकारकडून एकत्रित तिन्ही महिन्यांचा लाभ दिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
e-KYC दुरुस्तीसाठी मिळणार एकच संधी
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरीता https://ladakibahin.maharashtra.gov.in यावेबसाईटवर ई-केवायसीची सुविधा 18 सप्टेंबरपासून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तर ई-केवायसीची शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे.
मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटलं, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बहुतांश लाभार्थी या दुर्गम, ग्रामीण भागातील आहेत. e-KYC प्रक्रिया करत असताना त्यांच्याकडून काही चूक होणे स्वाभाविक आहे. या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळावी अशा आशयाची अनेक निवेदने विभागास प्राप्त झाली आहेत. सदर योजना ही महिला सक्षमीकरणाच्या हेतूने राबविण्यात येत आहे, म्हणूनच या महिलांना e-KYC करताना झालेली चूक सुधारण्याची संधी देणे अत्यंत गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन e-KYC मध्ये केवळ एकदाच सुधारणा करण्याची अंतिम संधी 31 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात येत आहे असंही मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.
राज्यातील तब्बल 52 लाख महिला अपात्र?
काही दिवसांपूर्वी माध्यमांमध्ये वृत्त आले की, छाननीत 52 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. यावर मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण देत म्हटलं, काही प्रसार माध्यमांवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत प्रसारित होत असलेली बातमी वस्तुस्थितीला धरून नाही. “प्राथमिक छाननीत 52 लाख लाभार्थी महिला अपात्र” अशा मथळ्याखाली आलेल्या या बातम्या निराधार आहेत. या योजनेत पारदर्शकता येण्यासाठी व योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा यासाठी राबवण्यात येणारी e-KYC प्रक्रिया अजूनही सुरू आहे.
















